Skip to content

लाल महाल माहिती मार्गदर्शन | Lal Mahal Information Guide in Marathi

  • by
महालाचे नावलाल महाल
ट्रेकिंगची सोपेपणा-कठीणपणाची पातळीसोपा
महालाचे ठिकाणपुणे
पायथ्याजवळचे गावकसबा पेठ

लाल महाल माहिती मार्गदर्शन | Lal Mahal Information Guide in Marathi

लाल महाल संक्षिप्त माहिती पुण्यातल्या कसबा पेठ मध्ये लाल महाल हा अतिशय दिमाखात उभा आहे. लाल महालच्या बाजूला शनिवार वाडा आणि मानाचा कसबा गणपती आहे. या कसबा गणपती ग्रामदैवताच्या जवळच झांबरे पाटलांकडून जागा विकत घेऊन तिथे या लाल महालाची बांधणी शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी केली होती. आणि याच महालात जिजाबाई आणि शिवाजी राजे यांनी वास्तव्य केले. याच महालाने शिवाजी राजांचे बालपण, शिक्षण, स्वराज्याची प्रतिज्ञा, न्यायीपणा पाहिला आहे. नंतर एक अविस्मरणीय घटना घडली त्याची इतिहासाने नोंद घेतली.
औरंगजेबाने इसवी सन 1660 साली त्याचा मामा शाहिस्तेखान यास शिवाजी महाराजांवर चाल करून जाण्यास सांगितले. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला ताब्यात घेऊन लाल महालात आपला मुक्काम ठोकला होता. त्यावेळेस शाहिस्तेखानाकडे लाखोच्या वर सैन्य होते शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक 400 मावळ्यांसह छापा घातला आणि यात शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली गेली तर शाहिस्तेखानाचा एक मुलगा ठार झाला. त्यानंतर शाहिस्तेखान शिवाजी राजाने आपली बोटे छाटली पुन्हा येऊन आपली गर्दन पण मारू शकतो या भीतीने तीन दिवसात येथून निघून गेला.
या भव्य वाड्यात गोठा, पागा आणि फौजेची व्यवस्था होती. महाराजांनंतर पेशवाईत 1930 साली बाजीराव पेशवे पुण्यात वास्तव्यास आले. तेव्हा लाल महालाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती. वाड्याच्या पायाचे दगड फक्त शिल्लक होते. बाजीराव पेशवे यांनी या जागेचे महत्त्व ओळखून या जागेवर नवीन इमारत बांधण्याची आज्ञा केली, तसेच या मोकळ्या जागेवर सदाशिवराव भाऊंची मुंज करण्यात आली होती. दुसरा एका उल्लेखात सध्याच्या बांधकामाच्या जागी अंबरखान्याची म्हणजेच धान्य कोठाराची इमारत होती. ही इमारत 1830 पर्यंत अस्तित्वात असल्याचे दाखले सापडतात. इंग्रज आमदानीत हा अंबारखाना पडल्यावर येथे जिजामाता उद्यानाची उभारणी करण्यात आली आज जरी मूळ लाल महाल अस्तित्वात नसला तरी पुणे महानगरपालिकेने महालाच्या जागेवर आत्ताच्या लाल महालाचे बांधकाम केले आहे. पुणे महानगरपालिकेने लाल महाल या वास्तूला प्रथम श्रेणी वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.

लाल महाल पाहण्यासारखी ठिकाणे

  1. प्रवेश आणि प्रवेश शुल्क

    श्रीमंत पेशवे गणेश मंदिराच्या समोरच लाल महालाचा मुख्य दरवाजा आहे. तेथून आपण प्रवेश करतो. लाल महालासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

  2. पार्किंग
    आतमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. रोडवर पार्किंगचा बोर्ड पाहून तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता.

  3. भव्य महाल

    आतमध्ये आल्यावर आपल्याला समोरच भव्य महाल पाहायला मिळतो. याच भव्य महालात आपल्या शिवरायांचे बालपण शिक्षण प्रशिक्षण आणि शिवरायांचे पराक्रम ऐकायला मिळल्यावर अंगावर अभिमानाने शहारे उभे राहतात.

  4. बाल शिवाजी आणि जिजामाता सोन्याचा नांगर फिरवताना ची मूर्ती

    यवनांनी गाढवाचा नांगर फिरवून शापित केलेल्या पुण्यनगरीत शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्यनगरीला पवित्र केलेली सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते.

  5. अश्व रुपी व अन्य मावळ्यांच्या मुर्त्या

    महालाच्या बाहेरच दोन अश्व रुपी व अन्य मावळ्यांच्या सुंदर अशा मुर्त्या आपल्याला पाहायला मिळतात.

  6. महालाच्या आत प्रवेश
    महालात प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य अशा महालाचे सुंदर रूप घडते. जेथे समोरच एक स्मारक दिसते, वाड्याचे रूप दिसते, खिडक्या दिसतात दरवाजे दिसतात. भिंतींवर सुंदर फोटो लावलेले दिसतात.

  7. राजमाता जिजाऊ स्मारक

    महालातून आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला जे स्मारक दिसते. तेच हे शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ यांचे स्मारक आहे. येथे जवळ जाता क्षणी आदराने आपली मान नतमस्तक होते.

  8. भिंतीवरचे चित्र फोटोज

    महालाच्या आत मध्ये भिंतीवरचे चित्र लावलेले आहेत. त्यावरून लाल महालावरील असलेला शिवाजी राजांचा जीवनपट उलगडतो.

  9. वेळ आणि दिवस
    आठवड्यातील सातही दिवस लाल महालला तुम्ही भेट देऊ शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत लाल महाल आपल्याला पाहायला मिळतो.

  10. जिजामाता उद्यान

    लाल महालाच्या शेजारीच जिजामाता उद्यान आहे हे फक्त महिला आणि लहान मुलांसाठीच आहे.

लाल महालावर कसे जायचे ?

  • खाजगी वाहनाने / सार्वजनिक वाहतूक
    खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही कसबा पेठ पर्यंत जाऊ शकता. तेथून लाल महाल जवळ आहे.

लाल महालचा नकाशा / गुगल नकाशा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत