Skip to content

सर्वात लोकप्रिय ऐतिहासिक महाराष्ट्रातील किल्ले

  • by
महाराष्ट्रातील किल्ले

सर्वात लोकप्रिय ५ ऐतिहासिक महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ले हे आपल्या समृद्ध वारसाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीची साक्ष देणारे, इतिहासातले सुवर्णपृष्ठ आहेत. या किल्ल्यांमध्ये विविध राजवंशांचे, व्यापारी केंद्रांचे, मराठ्यांचे आणि मुघलांचे ऐतिहासिक ठसे दडले आहेत. महाराष्ट्रात ३५० पेक्षा जास्त किल्ले असून, त्यापैकी बरेच सह्याद्रीच्या डोंगररांगेत, म्हणजेच महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले आहेत.

हे किल्ले केवळ ऐतिहासिक वारसाच सांगत नाहीत तर आजूबाजूच्या निसर्गाचे मनमोहक दृश्यही सादर करतात. त्यामुळे इतिहासप्रेमी, ट्रेंकर्स आणि निसर्गप्रेमींनाही ते आकर्षित करतात. हा लेख महाराष्ट्रातील काही निवडक किल्ल्यांचा परिचय करून देतो

रायगड किल्ला, रायगड

महाडच्या उत्तरेस २५ किलोमीटर अंतरावर असलेला रायगड किल्ला, डोंगररांगांनी वेढलेला एक अजरामर पराक्रम आणि ऐतिहासिक वास्तूंचा खजिना आहे. उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे, पश्चिमेला गांधारी नदी वाहते, तर पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा, दक्षिणेला मकरंदगड, प्रतापगड, वासोटा आणि उत्तरेला कोकणदिवा असा भव्य परिसर डोळ्यासमोर उभा राहतो. रायगडाचा माथा, राजधानीसाठी निवडण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आणि प्रशस्त आहे. शत्रूलाही अडचणीची ठरणारी ही भौगोलिक रचना आणि सागरी दळणवळणासाठी जवळीक, यामुळेच महाराजांनी रायगडाला आपल्या राजधानीचे गौरव प्रदान केले.

सिंहगड किल्ला, पुणे

पुण्याच्या नैऋत्येला २५ किलोमीटर अंतरावर, समुद्रसपाटीपासून ४४०० फूट उंचीवर उभा असलेला सिंहगड किल्ला, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेला, पुणे शहराच्या जवळच असल्यामुळे नेहमीच गजबजलेला असतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेतील भुलेश्वर रांगेवर “कोंढाणा” नावाचा प्राचीन किल्ला होता. पुढील काळात हा किल्ला सिंहगड म्हणून प्रसिद्ध झाला.

प्रतापगड किल्ला, सातारा

प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये बांधला.  शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या वीरतेची अनेक गाथा इतिहासात लिहिलेली आहेत आणि त्यात प्रतापगडाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. इ.स. १६५९ मध्ये शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात याच किल्ल्यावर लढाई झाली आणि शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी करून मराठा साम्राज्याचा लौकिक वाढवला.

शिवनेरी किल्ला, जुन्नर

पुण्यापासून जवळपास १०५ किलोमीटर अंतरावर जुन्नर शहराजवळच असलेला शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीसाठी प्रसिद्ध आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी, महाराष्ट्राचे दैवत, राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे पावन झालेल्या या भूमीला इतिहासात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर आहे.

पुरंदर किल्ला, पुणे

पुरंदर किल्ला हा पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर भुलेश्वराच्या डोंगर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.सिंहगडासारखाच हा किल्लाही त्याच डोंगररांगेमध्ये वसलेला आहे. संत सोपानदेव यांची समाधी असलेल्या सासवड गाव जवळच, पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी सईबाई यांच्या पोटी झाला होता. यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत